Thursday, January 31, 2008

भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल

भाऊसाहेब पाटणकरांच्या 'दोस्त हो' ह्या गझलसंग्रहातल्या काही चारोळ्या वेचून ठेवतो आहे. हे काही रसग्रहण नाही. त्यांची भाषा इतकी सोपी आहे की नुसती चारोळी वाचली की झालं रसग्रहण. शिवाय आजकाल रसग्रहणाच्या नावाखाली कवितांच्या ओळींचं जे डिसेक्शन करतात लोकं, ते वाचून ते रसग्रहण हे 'सूर्यग्रहणा'सारखं 'ग्रहण' वाटतं. कवितेच्या मूळ ओळींमध्ये जो रस आहे, तो त्या कवितेच्या पंचनाम्यामागे झाकून टाकतात. मराठी कवितांवरचं हे अश्या प्रकारचं रस-ग्रहण केव्हा सुटेल तो सुदिन. तूर्तास (खरं म्हणजे इथे 'सध्या' हा शब्दही चालला असता, पण ग्रहणकाळात आम्हाला 'तूर्तास, अदमासे, साद्यंत, अभ्युत्थान' असले शब्द आठवतात. तर सध्या,) भाऊंच्या ओळी जश्या आहेत तश्याच आपल्यासमोर (तुमच्यासमोर) ठेवत आहे. (आठवून लिहितो आहे, एखादा शब्द चुकीचा लिहिला असेल तर लगेच कळवा).
जाणकारांना सांगण्याची गरज नाही तरीही एक सुचवू इच्छितो (आम्ही पडलो 'सल्लेखोर' स्वभावाचे!) गझल्/चारोळी वाचताना ह्याक्रमाने वाचाव्या- पहिल्या दोन ओळी सलग, मग पुन्हा त्याच ओळी, मग फक्त तिसरी ओळ दोनदा (इथे चौथ्या ओळीविषयी उत्सुकता ताणली गेली नसेल तर उसनी आणावी. अर्थात भाऊंच्या चारोळ्या ती वेळ तुमच्यावर येऊ देणार नाहीत) आणि शेवटी चौथी ओळ (एकदाच. ती कशाला दोनदा वाचायची?). हा प्रयोग खालच्या ओळी वाचताना करून पहा, मजा येईल वाचताना.

दोस्त हो,

पत्रे तिला प्रणयात, आम्ही खूप होती धाडिली
धाडिली होती अशी की, नसतील कोणी धाडिली
धाडिली मजला तिनेही, काय मी सांगू तिचे
सर्व ती माझीच होती, एकही नव्हते तिचे

पत्रात त्या जेव्हा तिचेही, पत्र हाती लागले
वाटले जैसे कुणाचे, गाल हाती लागले
पत्रातही त्या हाय ! तेथे, काय ती लिहिते बघा
माकडा, आरशात अपुला, चेहरा थोडा बघा

सार्थता संबोधनाची, आज ही कळली मला
वैय्यर्थता या यौवनाची, तीही अता कळली मला
नाही तरीही धीर आम्ही, सोडला काही कुठे
ऐसे नव्हे की, माकडाला, माकडी नसते कुठे?

1 comments:

<--sahdeV-- said...

Ek number!!!!

Ani to sallaa mplement kela mhanunach kahishi jaasta maja ali asaavi! :)

Mi hya vachalya nahiyet gazali, plz send me link if you find such collection! Mala avdtil vachayla!