Posts

Showing posts from 2007

आम्ही कोण

आम्ही कोण म्हणूनि काय पुसता आम्ही उद्याचे रवी उल्लंघू सगळ्या दिशांपलिकडे आव्हान-क्षेत्रे नवी संचारू मनसोक्त वायुलहरीं- वरती पुन्हा एकदा पादाक्रान्त करूनि टाकु सगळी धरती पुन्हा एकदा (आमची प्रेरणा- केशवसुतांची "आम्ही कोण म्हणूनि काय पुसता आम्ही असू लाडके" आणि केशवकुमारांची "आम्ही कोण म्हणूनि काय पुसता दांताड वेंगाडुनी")

विष्णुगुप्त - १

सकाळची सूर्याची कोवळी किरणं डोळ्यांवर येण्यापूर्वीच विष्णु झोपेतून जागा झाला. अजून सूर्योदय व्हायचा होता, तरी थोडासा उजेड होता. समोरच्या रस्त्यावर फार काही वर्दळ नव्हती. गवळ्यांचे पाय गोरसदोहनाकरिता गोठ्याकडे वळले होते. काही गृहिणी कमरेवर घागर घेऊन पाण्यासाठी सिंधूतीरावर निघाल्या होत्या. काही नागरिक सूर्यदर्शनाकरिता घराबाहेर पडले होते. कोंबड्याच्या आरवण्याखेरीज इतर पक्ष्यांनीही आपल्या कूजनाने सूर्योदयाची चाहूल दिली होती. त्या थोड्याश्या नीळसर तांबूस प्रकाशानेही रात्री चमकणार्‍या तारामंडलांना आकाशातून नाहीसं करून टाकलं होतं. दूर पश्चिम क्षितिजावर अजूनही चंद्र फिकट मंद दिसत होता. पण विष्णूला या कशाचच काही नव्हतं. कशाने तरी झपाटल्यासारखा तो उठला. आपल्या अंगावरची वस्त्रं हातानेच वरच्यावर झाडल्यासारखी केली. बरोबर आणलेल्या तुटपुंज्या सामानाची झोळी त्याने खांद्यावर टाकली आणि तडक त्या धर्मशाळेच्या बाहेर पडला. आजूबाजूला एकवार नजर टाकून त्याने दिशांचा अंदाज घेतला आणि पश्चिम दिशेच्या रोखाने वाट फुटेल तशी पावलं टाकू लागला. इतर नगरजनांसाठी ती सकाळ नेहमीसारखीच होती,पण विष्णूच्या आयुष्यातला हा एक महत...

बोलायाचे कितीक आहे पण....

माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही फुरफुरणारे बाहू माझे प्रचंड शक्ती आणि उसासे तोडायाचे बंधन जे जे आवेशातुन उतरत नाही थरथरणार्‍या स्वरात माझ्या कंपुन उठतिल भाव-भावना स्वच्छंदी गाण्यात परंतू तान मोकळी येतच नाही दहा दिशांच्या रिंगणातुनि क्षितीज सुद्धा उल्लंघिन मी एकवटाया सारे बळ परि मनगट ते सरसावत नाही रंग उषेचे हातामधुनि उधळित जाईन पानोपानी घेतो मी कुंचला तसा अन् विचार तेव्हा रंगत नाही मी वेडा आनंदासाठी धुंद मोकळ्या श्वासासाठी मन्मनात जे आता आहे अंतरातुनि बरसत नाही उगाच फिरतो पृथ्वीवरती शोधित जातो उजाड नाती मी माझ्याशी ठेऊन नाते माझ्याशीही बोलत नाही कवितेची पार्श्वभूमी-पुरुषोत्तम करंडक २००६ मधे COEP (पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय) ने सादर केलेल्या "होते कुरूप वेडे" या एकांकिकेसाठी लिहिलेली ही कविता आहे.लेखन, कविता यांची आवड असलेल्या, पण परिस्थिती/ पालकांच्या दबावामुळे आपल्या आवडी-निवडींकडे दुर्लक्ष करून केवळ पाठ्य अभ्यासात बुडून गेलेल्या मुलाची घुसमट या एकांकिकेमधे आहे. तो मुलगा (समीर) रोज अनुदिनी (डायरी) लिहीत असतो. या एकांकिकेमध...