हलकल्लोळ - ७: मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत?
(लसिथ मलिंगाने केली तर ती राउंड आर्म अॅक्शन आणि आम्ही केली तर ती फेकी बॉलिंग काय!) (पार्श्वभूमीकरिता भाग-५ आणि भाग-६ वाचल्यास बरे!) मागच्या भागांमध्ये आपण पाहिलं की प्राणी हे वेगवेगळ्या आकाराचे (size) असताना निसर्गाने त्यांना वेगवेगळं रूप (shape) कसं दिलं आहे, किंवा त्यांना वेगवेगळ्या रूपांची का आवश्यकता आहे. पण आपल्याला कधी असा प्रश्न पडतो का, की या वेगवेगळ्या आकारांच्या प्राण्यांना आजुबाजूचं विश्व हे आपल्याला दिसतं तसंच दिसतं का? त्यांना हालचालीसाठी तेवढेच कष्ट पडतात का जेवढे आपल्याला पडतात? अगदी सगळ्या गोष्टींची उत्तरं मलाही माहित नाहीत, पण यातल्या काही विषयांवर आपण गप्पा मारू. कदाचित त्यातून काही उत्तरं समजतील, काही सुचेल! मागच्या भागात ज्या हॅल्डेन काकांबद्दल आपण वाचलं, त्यांनी अश्या प्रकारचा अभ्यास केला होता. त्यांच्या प्रमाणे 'स्टीवन व्होगल' हा असाच एक संशोधक. सध्या तो ड्युक विद्यापीठ (अमेरिका) येथे जीवशास्त्राचा प्राध्यापक आहे. त्याने लिहिलेली काही पुस्तकं खूप मस्त आहेत. त्यातलं 'Life's devices - The physical world of animals and plants' ...