निबंध: गाय - व्याकरणिक दृष्ट्या उपयुक्त पशु


खरं तर विषय 'माझा आवडता प्राणी - गाय' हा आहे, परंतु ते संशोधन अगोदर प्रकाशित झाल्यामुळे (Review by PanditV., 2012) तसलंच संशोधन वेगळ्या नावाखाली प्रकाशित करायचा हा खटाटोप. ह्यातील काही कल्पना Pandit V., Pundalik R., Kher A., Kane M., Pranajape C. यांच्याकडून घेतल्या आहेत त्यांचे सुरवातीच्या बिगिनिंगमदी यक्नोलेज्मेंटला आभार मानतो.

आता गाय आणि व्याकरण या विषयांकडे वळूया. गाय हा शब्द संस्कृतातील 'गौ' या शब्दावरून आला असा प्रवाद अनेक वर्षे प्रचलित आहे (Kane M.). किंबहुना बऱ्याच प्राण्यांची नावे संस्कृतातून आल्याचा दावा लोक करतात. पण आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको. कारण विविध भाषांचा अभ्यास करता असं लक्षात येईल कि इंग्रजीमधील 'GUY' ह्या शब्दाचा उच्चार गायीशी सगळ्यात जवळचा आहे (Pandit V.). संस्कृतमध्ये गौ मधल्या 'औ' चे रुपांतर 'आव' असे होते हि गोष्ट हि मंडळी सोयीस्करपणे विसरतात. तर हा शब्द इंग्रजीमधून आला असून तिकडे मुलांना गाय म्हणण्याचे कारण पूर्वी तिकडे गाय ह्या पशूचे पालन होत असे. सकाळी सकाळी गवळी गोठ्यात जाऊन गायींना 'Hi guys!' अशी प्रेमळ साद घालत असे. रानात चरायला गेलेल्या मुलांना आणि त्यांच्या गायीला एकत्र हाक मारता यावी ह्या सोयीच्या दृष्टीने दोघांना गाय असे संबोधण्यात येत असे. 

त्यानंतर अगदी नजीकच्या काळात, जेव्हा आनंदी बाईंनी ध चा मा केला, ते पाहून तिकडे कोणीतरी गा चा 'बॉ' करून मुलांना 'बॉय' असे म्हणू लागले. तसेच भारत शोधार्थ येणाऱ्या पाहुण्यांनी भाषिक देवाण-घेवाण केली, तेव्हा इंग्रजीतला गाय हा शब्द मराठी लोकांनी घेतला आणि त्या बदल्यात आपला 'काऊ (cow)' हा शब्द देऊ केला. त्यामुळेच कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही अशी म्हण प्रसिद्ध झाली, याचे कारण दोघांना काऊ च म्हणतात. काहींच्या मते गाय शापच देत नाही (Kher A.). आता मराठीत काऊ शब्दही नामशेष होत चालला आहे. सध्या फक्त लहान बाळे आणि त्यांना गोष्टी सांगणारे पालक हा शब्द वापरतात. परंतु पूर्वी संत ज्ञानेश्वरांसारखे योगीसुद्धा हा शब्द (मोठेपणी) वापरत असत. त्यांनी लिहून ठेवले आहे, 'उड उड रे काऊ, तुझे सोन्यानी मढवीन पाऊ' (Kulkarni et al.). यातील 'रे' हा संगीतातील स्वर असल्याचे काहींचे मत आहे आणि कोकिळा जशी पंचम स्वर लावते तसा कावळा हा रिषभ स्वर लावतो (कदाचित गायीला वृषभाची आठवण यावी म्हणून). आपली मुले एका गायक कुटुंबात वाढावी म्हणून कोकिळा कावळ्याच्या घरात अंडी ठेवते, पण जेव्हा बाकीचे कावळे मोठेपणी खर्ज स्वर लावायला लागतात, तेव्हा हा स्वरातील फरक ओळखून कोकीळ वेगळा होतो. ते असो.

गायीच्या पोटात ३३ कोटी देव असतात असे काही जण नमूद करतात (Pandit V. आणि Kher A.). तर काहीजण 'गोगलगाय पोटात पाय' असे म्हणतात. म्हणजे पोटात पाय असणाऱ्या गायीला गोगलगाय असे म्हटले जाते. इंग्रजीमध्ये गॉगल घालणाऱ्या मुलाला गॉगलगाय असे म्हणून तत्पुरुष समास बनवतात. तसेच सगळीकडे शोध घेत फिरणाऱ्या गायीला 'गुगल गाय' म्हणण्याचा प्रघातही आताशा प्रचलित होतो आहे. नवीन संशोधनाप्रमाणे गोगलगायीला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढता येत नाही, कारण पाय (=३.१४१५९२६५३५९....) तिच्या पोटात असतो. (गणितात ह्या पाय चे चिन्ह - दोन उभे पाय आणि त्यावर कंबरेची आडवी रेघ - असे सयुक्तिक आहे).

गायीच्या नावाप्रमाणे तिचे शेणही व्याकरणाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. पहा कसे ते: विष आणि शेण एकात एक मिसळले असता विशेषण तयार होते (Shrinath Bhat). गायीचा आवाज प्रत्येक भाषेत वेगवेगळा असावा. मराठी गाय 'हम्मा' अशी ओरडते तर इंग्रजी काऊ 'moo' असे ओरडते. रेहमानने 'हम्मा हम्मा' या गाण्याला चाल लाऊन मराठी गायीचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवला.

व्याकरणातील (आणि दुधाच्या रूपाने शिकरणातील) योगदानामुळे गायीचे व्याकरणिक महत्त्व अधोरेखित झाले आहे ह्या निष्कर्षावर आम्ही आलो आहोत.

- शंतनु

Comments

अतिशय उद्बोधक माहितीबद्दल शंतनू रावां'चे धन्यवाद
Guyana या देशाचे नाव गाय-आणा असल्याने सर्व गोपालक आपापल्या गाई घेऊन इमिग्रेशन काउण्टर वर गर्दी करत असल्याचे ऐकिवात आहे..
sahdeV said…
posts madhe fbposts chya links taaka, mhanje... hi aapli vinantich bara kaa! Karan comments dekhil bhannat hotya! Revisiting would be fun!

https://www.facebook.com/shantanu.bhat/posts/10151142082973835?stream_ref=10
https://www.facebook.com/shantanu.bhat/posts/10151140637353835?comment_id=26664547

Popular posts from this blog

कोल्हे-कुई

कषाय-दान

पहिले अक्षर